बेळगाव : पीएसआय पित्याच्या अनैतिक संबंधांची चौकशी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. पित्याच्या, प्रेयसीच्या सांगण्यावरून 3 पोलिसांनी या युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.
राहुल सिद्दप्पा कर्णींग असे या घटनेतील दुर्दैवी गंभीर जखमी युव्हीलचे नाव आहे. त्याचे वडील सिद्दप्पा कर्णींग हे पोलीस खात्यात पीएसआय आहेत. त्यांचे कोण्णूर येथे राहणार्या श्रीदेवी नामक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप राहुलने केलाय. श्रीदेवीला या संबंधांचा जाब विचारण्यासाठी राहुल कर्णींग कोण्णूरला गेला होता. त्यावेळी वडील सिद्दप्पा आणि श्रीदेवी यांनी त्याला अर्वाच्य शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर राहुल तेथून परतला. तो धुपदाळ पुलाजवळ असतानाच श्रीदेवीच्या तक्रारीवरून आलेल्या 112 क्रमांकाच्या वाहनातील 3 पोलिसांनी त्याला अडवून वाहनात कोंबले. तेथून हे पोलीस त्याला श्रीदेवीच्या घराकडे घेऊन गेले. त्यावेळी या 3 पोलिसांनी श्रीदेवीसमक्ष राहुलला काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली अशी तक्रार राहुलने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत त्याने एसपींनाही तक्रार दिली आहे. दरम्यान, राहुल आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वडिलांच्या अफेअरची माहिती देऊन त्याने सांगितले की, वडिलांसोबत असलेल्या भानगडीचा जाब श्रीदेवीला विचारल्याने तिच्या सांगण्यावरून घटप्रभा पोलिसांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. दारूच्या नशेत तर्र असलेल्या पत्तार व अन्य दोघा घटप्रभा पोलिसांनी आपली हद्द सोडून गोकाक पोलिसांच्या हद्दीत येऊन माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. मला पोलीस ठाण्याला नेण्याऐवजी श्रीदेवीच्या घरासमोर नेऊन तिने पुरे म्हणेस्तोवर बेदम मारहाण केली आहे. याबाबत मी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही अशी माहिती राहुलने दिली.
