बेळगाव : हलगा ते मच्छे बायपासचे काम तात्काळ बंद करण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने बजावला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तोंडघशी पडले असताना, शेतकर्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 नोव्हेंबर 2021 ला सदर कामाची सुरुवात केली होती. या विरोधात शेतकर्यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने झिरो पॉइंट झाल्याशिवाय काम सुरू करू नये असा आदेश बजावला होता. चार महिन्यानंतर बायपासचे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु न्यायालयाला सुट्टी मिळाल्याचे पाहून पोलिस बंदोबस्तात काम वेगाने हाती घेतले होते.
त्यानंतर शेतकर्यांनी सातत्याने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. तरी हे काम सुरू होते. शेतकर्यांनी या प्रकरणी बेंगलोर उच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बँच समोर याचिका दाखल केली. न्यायालयाने स्थगिती असताना देखील काम सुरू ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ही काम सुरू होते.
चार दिवसांपूर्वी न्यायालयाने काम सुरू ठेवल्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची सुचना महामार्ग प्राधिकरण व प्राधिकरणाला केली होती. याबाबत काल मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांची मागणी फेटाळून काम त्वरित बंद करण्याची सूचना केली आहे.
