बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण संपन्न
बेळगाव : वाढत्या महागाईची झळ अन्य क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रालाही बसली आहे. छपाईचे दर वाढले आहेत. त्यातच आता वृत्तपत्राला लागणाऱ्या कागदाचे दरही भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे मध्यम व लहान वृत्तपत्रे चालविणे कठीण झाले आहे.
ग्रामीण भागातील गावागावापर्यंत हीच वृत्तपत्रे जाऊन पोहोचतात. यामुळे ही वृत्तपत्रे जगणे आवश्यक आहेत. यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र कागदाचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका ठरावान्वये करण्यात आली.
अध्यक्ष कृष्णा शहापूरकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुहास हुद्दार यांनी हा ठराव मांडला व राजेंद्र पोवार यांनी त्यास अनुमोदन दिले. पद्मावती चेंबर्समधील पत्रकार भवनमध्ये मंगळवारी ही सभा झाली. व्यासपिठावर उपाध्यक्ष महेश काशीद, कार्यवाह शेखर पाटील होते.
प्रारंभी कार्यकारिणीचे सदस्य दिवंगत प्रकाश माने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रारंभी स्वागत केले व पत्रकार संघाचा २०२१-२२ सालचा अहवाल सादर केला. यानंतर कार्यवाह शेखर पाटील यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, २०२१-२२ सालचा जमाखर्च, ताळेबंद व अंदाजपत्रक सादर केले. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या घटनेत आवश्यक ते बदल करण्यासही सभेने मंजुरी दिली.
कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत, विलास अध्यापक शिवराज पाटील यांनी सभेत विविध सूचना केल्या. उपाध्यक्ष महेश काशीद यांनी आभार मानले. बैठकीस चंद्रकांत कदम, बबिता पोवार, शशिकला पाटील, सुनील गावडे, परशराम पालकर, प्रकाश काकडे यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.