बेळगाव : बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कै. मुकुंद परब यांची शोकसभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली.
शोकसभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. पी. एम. टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अॅड. बालमुकुंद राणे म्हणाले की, मित्र असावा तर अजातशत्रू कै. मुकुंद परब यांच्या सारखा असावा. त्यांच्यासोबत मी गेली चाळीस वर्षे राहिलो. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. मात्र त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. ते नेहमी सर्वांना सढळ हस्ते मदत करीत असत. अॅड. श्रीपाल कळ्ळीमणी यांनी कै. मुकुंद परब हे एक उत्तम सल्लागार होते. सहकार क्षेत्र असो, बँकिंग क्षेत्र असो अथवा इतर सामाजिक अडचणी असोत त्यांच्यावर योग्य तो सल्ला ते देत असत असे सांगितले.
अॅड. दिलीप सिद्धांते यांनी कै. मुकुंद परब हे गरीब गरजू लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असत, पण त्याची वाच्यता त्यांनी कधीच केली नाही असे सांगितले. अॅड. राजहंस यांनी कै. अॅड. परब म्हणजे चालते बोलते मार्गदर्शक, मितभाषी सर्वांना समजून घेणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे सर्व जातीधर्मांतील लोकांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अॅड. टपालवाले म्हणाले की, मराठी भाषिक वकील संघटना स्थापण्यामध्ये कै. मुकुंद परब यांचा सिंहाचा वाटा होता. मराठी भाषिक वकील संघटना ही मराठी भाषिक वकिलांना मार्गदर्शक ठरावी. मराठी वकीलांच्या अडचणी सोडविण्यासाठी ही संघटना म्हणजे एक व्यासपीठ ठरावे अशा मताचे कै. मुकुंद परब कुशल संघटक होते. त्यांचे कार्य कधीही विसरण्यासारखे नाही असे म्हणाले.
सभेचे सूत्रसंचालन अॅड. सुधीर चव्हाण यांनी केले. त्यांनी कै. अॅड. परब यांच्या म. ए. समितीच्या कार्याची ओळख करून दिली. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते होते. समितीच्या सर्व लढ्यांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांचे त्या काळचे बादशाही बोर्डिंग म्हणजे सर्व पुढारी मंडळींची व्यवस्था करण्याचे ठिकाण होते, असे अॅड. चव्हाण यांनी सांगितले.
शोकसभेला अॅड. विजय मोहिते, अॅड. अमर येळ्ळूरकर, अॅड. सतीश बांदिवडेकर, अॅड. अनिल सांबरेकर, अॅड. सोमनाथ जायण्णाचे, अॅड. एम. पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, अॅड. पी. के. सिद्धांते, अॅड. दिवटे आदी बहुसंख्य वकील उपस्थित होते.
