दिवसभरात दिले दोन कोटी डोस
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही आहे. सध्या परिस्थिती हाताबाहेर नसली तरीही कोरोनाचं संकट केंव्हाही रौद्ररुप धारण करु शकतं. या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या या कार्यक्रमाअंतर्गत 77 कोटी लसीकरण पार पाडण्यात आलं आहे. भारतामध्ये आज दुपारी दीड वाजेपर्यंत 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला होता. तर आता या आकडेवारीने 2 कोटींचा टप्पा गाठला आहे. सायंकाळच्या आतच दोन कोटींचा लसीकरणाचा टप्पा एका दिवसांत गाठण्याचा हा विक्रम देशात पहिल्यांदाच घडला आहे.
याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करुन देताना म्हटलंय की, व्हॅक्सिन सेवा करताना आज देशातील आरोग्य कर्मचार्यांनी देशवासीयांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना ही भेट दिली आहे. मोदींच्या वाढदिनी आज भारताने नवा विक्रम प्रस्थापित करत एका दिवसातच 2 कोटी लसींचा ऐतिहासिक असा आकडा पार केला आहे.
तर दुसरीकडे या लसीकरण कार्यक्रमामध्ये आता आणखी एक विक्रम होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत एक अब्ज लसीकरण पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा डोस असे लसीकरण समाविष्ट असेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारतात काल रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 77,24,25,744 लसीकरण पार पडले आहे.
बेळगावात उत्तम प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी कर्नाटकात राबविण्यात आलेल्या राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 73 हजार 121 जणांचे लसीकरण करण्यात आले. राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियाना अंतर्गत बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा व तालुका आरोग्य खात्यातर्फे आज जिल्ह्यात लसीचे 3 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी सर्व सरकारी आणि बहुतांश खाजगी हॉस्पिटल्ससह ग्रामपंचायत व तालुका पंचायत पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय भवन आदी ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात आली होती. या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात 652 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा पहावयास मिळत होत्या. लसीकरणाच्या या महाअभियानाअंतर्गत जिल्ह्यात दुपारी 1:30 वाजेपर्यंत लसीचे 73 हजार 735 डोस देण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही संख्या वाढत जाऊन 1 लाख 73 हजार 121 डोस इतकी झाली होती.
राज्यव्यापी बृहत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा व तालुका आरोग्य खाते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 18 खाजगी हॉस्पिटल्समध्ये आज मोफत कोरोना लसीकरण शिबिरं पार पडली. शहरातील संबंधित सर्व हॉस्पिटल्समध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर घेण्यात आले. कसबेकर मटगुड हॉस्पिटल (शिवाजीनगर), वेणुग्राम हॉस्पिटल (तिसरे रेल्वे गेट टिळकवाडी), श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (सन्मान हॉटेल मागे), डेक्कन मेडिकल सेंटर (रेल्वे ब्रिज जवळ), व्हीनस हॉस्पिटल (महात्मा फुले रोड शहापूर), स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (शिवबसवनगर), लाईफ लाईन हॉस्पिटल (अनगोळ मेन रोड), यश हॉस्पिटल (महाद्वार रोड शहापूर), भाटे हॉस्पिटल (बीम्स जवळ), येळ्ळूर रोड केएलई हॉस्पिटल, लेक व्ह्यू हॉस्पिटल (गांधीनगर), लाईफ केअर हॉस्पिटल (दरबार गल्ली), श्री साई हॉस्पिटल (वडगाव), लोटस हॉस्पिटल (मंडोळी रोड टिळकवाडी), अपूर्व हॉस्पिटल (शिवाजी उद्यानानजीक), विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (आयोध्यानगर), धन्वंतरी हॉस्पिटल (सुभाषनगर) व लेक व्ह्यू हॉस्पिटल गोवावेस या ठिकाणी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या सर्व हॉस्पिटलसमोर आज दिवसभर कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दरम्यान, सरदार हायस्कूल येथील लसीकरण शिबिराचे उद्घाटन खा. मंगला अंगडी आणि आ. अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करणारे विचार मंडले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. केळकरबाग येथे कोविड लसीकरण केळकर बागेतील रहिवासी समाजसेवक परेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी पावले बिल्डींगमध्ये नागरिकांसाठी कोविड लसीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आ. अनिल बेनके यांच्या प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम पार पडला. या लसीकरणामध्ये 100 हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी प्रथमेश शिंदे, स्मिता आर्य, गुरुनाथ किरमटे, रूपा कट्टी, हर्ष शिंदे आदी नागरीक उपस्थित होते.