बेळगाव : उत्कृष्ट समाजकार्याबद्दल दरवर्षी श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त मराठा रजक समाज बेळगावतर्फे दिला जाणारा ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ यंदा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना जाहीर झाला आहे.
मराठा रजक समाज बेळगावतर्फे दरवर्षी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त सामाजिक कार्यकर्त्याचा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ‘गाडगेबाबा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो.
यावर्षी पुरस्कार निवड समितीने सदर पुरस्कारासाठी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष तसेच फाउंडेशनच्या हेल्प फाॅर निडी, फुड फाॅर निडी आणि एज्युकेशन फॉर निडी या शाखांचे मार्गदर्शक प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांची निवड केली आहे.
मराठा रजक समाज बेळगावतर्फे येत्या मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी श्री संत गाडगेबाबांची 66 वी पुण्यतिथी आचरणात आणली जाणार आहे. पुण्यतिथी निमित्त या दिवशी सकाळी 9 वाजता श्री गाडगेबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन होईल.
त्यानंतर सकाळी 10 वाजता स्वच्छता अभियान राबविले जाईल. स्वच्छता अभियानानंतर सकाळी 11 वाजता सभा आणि दुपारी 1 वाजता महाप्रसाद होणार असून सायंकाळी 5 वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.