बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन -2022 आज शनिवारी दुपारी कवयित्री शांता शेळके साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर कॅम्प येथे प्रा. अशोक अलगुंडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार या मराठी बालसाहित्य संमेलनाचा शुभारंभ आज सकाळी ग्रंथदिंडीने झाला. ग्रंथदिंडीनंतर आयोजित संमेलनाच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून म्हणून बांधकाम व्यावसायिक वननेस डेव्हलपर्स चालक आर. एम. चौगुले उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी, वि. गो. साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आर. एम. चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि वि. गो. साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात आर. एम. चौगुले यांनी उपस्थित बालसाहित्यिकांसह विद्यार्थी -विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून संमेलनाला शुभेच्छा दिल्या.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात बाल कथाकरांचा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये समृद्धी सांबरेकर (महिला विद्यालय), मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन), समृद्धी पाटील (बालिका आदर्श विद्यालय), मधुरा मुरकुटे (महात्मा फुले विद्यालय कार्वे) आणि कुशल गोरल (मराठी विद्यानिकेतन) या बालकथाकारांनी सहभाग दर्शवून आपल्या कथा सादर केल्या. दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या यंदाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शांतांजली’ हा गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये बालकवींचे कवी संमेलन झाले या कवी संमेलनात बेळगाव परिसरातील मराठी माध्यमांच्या शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या.
स्नेहल दळवी (बालवीर विद्यानिकेतन), समृद्धी पाटील (बालिका आदर्श), रचना पावले (मराठी विद्यानिकेतन), समीक्षा अष्टेकर (मराठा मंडळ हायस्कूल), सौम्या पाखरे (मराठी विद्यानिकेतन), लावण्या सांबरेकर (महिला विद्यालय), अमृता पाटील (न्यू इंग्लिश स्कूल मुतगा), सर्वेश सुतार (मराठी विद्यानिकेतन), पवन पाटील (सेंट्रल हायस्कूल), समृद्धी देसाई (ठळकवाडी हायस्कूल) आणि प्रथमेश चांदीलकर (मराठी विद्यानिकेतन) या बालकवींनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. आजच्या या मराठी बालसाहित्य संमेलनास मराठी विद्यानिकेतन शाळेबरोबरच बेळगाव शहर परिसरातील मराठी शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, हितचिंतक आणि साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.