राजू पोवार : मानकापूरमध्ये बैठक
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्षभर आंदोलन मोर्चे व निवेदने दिले आहेत. पण त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी
बेळगाव विधान सौधला रयत संघटनेसह शेतकऱ्यातर्फे घेराव घालण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. मानकापुर येथे आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळवण्यासाठी आणि ऊसाला पाच हजार पाचशे रुपये दर मिळवण्यासाठी दहा महिने आंदोलन चालू आहे. अधिवेशनामध्ये मंगळवारी बेळगाव विधानससौधला घेराओ घातला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर शपथ घेऊन मंत्री बनलेत मात्र तेच आता शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम करीत आहेत. तीन वर्षापासूनच्या महापुराच्या संकटातून शेतकरी अजून सावरला नाही. कोरोना काळात पिकवलेल्या शेती मालाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विधानसोधला घेराओ घातला जाणार आहे. चिकोडी व निपाणी तालुक्यातून, दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांचा ताफा सज्ज असून संपूर्ण कर्नाटक राज्यातून कमीत कमी ८० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत.
यावेळी मल्हारी हांडे, विजय माळी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस निपाणी तालुका रयत संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश पाटी, मानकापूर रयत संघटनेचे शाखाध्यक्ष पवनकुमार माने, ढोणेवाडी शाखा अध्यक्ष एकनाथ सादळकर, रमेश मोरे, महादेव महाकाळे, संजय माळी, श्रीपती निंनगुरे, आप्पासो हातगिने, नाना माळी, शंकर पुजारी आप्पासो मोरे, सुभाष मोरे, सुखदेव म्हाकाळे, राघू म्हाकाळे, दगडू पुजारी, उत्तम हांडे यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.