बेळगाव : बेळगावात उद्या होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असलेले कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज रविवारी दुपारी हा आदेश बजावला. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारीही सुरु आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी उद्या बेळगावात येण्याचे ठरवून कर्नाटक सरकारला आपल्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमही पाठवून दिला आहे. मात्र करनाटकी सरकारने त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडण्याशी शक्यता असल्याचे थातुरमातुर कारण देत प्रवेशबंदी केली आहे. सीमाप्रश्नावरून बेळगावात अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला देत, महाराष्ट्रात कर्नाटकाच्या बसेसना काळे फासल्याचे कारण देत त्यांच्या दौऱ्यामुळे बेळगावात भाषिक सौहार्द बिघडण्याची, कन्नड-मराठी भाषकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खा. माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी सीआरपीसी १९७३ कायद्याच्या कलम १४४ (३) अन्वये प्राप्त अधिकारांतर्गत हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.