माजी मंत्री हसन मुश्रीफ : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मविआ आघाडीचा मोर्चा
कोगनोळी : कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्यावर अन्याय केला आहे. बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाही विरोधी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक यांनी कोणतेही पाऊल उचलू नये अशा सूचना करून देखील कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी गुंडगिरी करत महामेळव्याला जाणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. बेळगाव येथे होत असलेल्या महामेळाव्याला शांततेत पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना अडवून विनाकारण त्रास देणे हे कर्नाटकचे कृत्य निंदनीय आहे. म्हणून कर्नाटक शासनाचा आपण निषेध व्यक्त करत आहे. असे सांगितले.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नावर समिती नेमली या समितीतील नेत्यांनी कर्नाटकात जाणे क्रमप्राप्त होते. त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांची जाणं नाही. कर्नाटकच्या भीतीपोटी ते गेले नाहीत. महाराष्ट्रातील नेते मंडळी व कार्यकर्ते बेळगाव येथील मराठी भाषिकांच्या अधिवेशनला जात असताना अडवणे हे कर्नाटक शासनाचे गुंडगिरी चे लक्षण आहे. हे महाराष्ट्रातील शिवसैनिक कधीच खपवून घेणार नाहीत.
सकाळी दहा वाजता कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदीवर घेऊन आले. यावेळी कर्नाटक सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, कर्नाटक भाजप सरकारचा धिक्कार असो, शिंदे फडवणीस सरकारचा धिक्कार असो, बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह कारवार महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या मोर्चातील लोकांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी येथील पोलीस व मोर्चेधारक यांच्यात झटापट झाली. आक्रमक झालेल्या मोर्चातील लोकांनी महामार्गावरच बसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या वतीने दूधगंगा नदी परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रमक झालेल्या मोर्चेधारकांना कर्नाटक पोलिसांनी प्रवेश दिला नसल्याने महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या मोर्चात संजय पोवार, भैय्या माने, सचिन चव्हाण, वैभव आडके, राजेश लाटकर, आदिल फरास, आर के पवार सुनील मोदी, प्रकाश गाडेकर, नवल बोते, प्रवीण काळबर, यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कर्नाटक पोलिसांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, डी वाय एस पी बसवराज यल्लीगार, निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह शेकडो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.