महाराष्ट्रातील पत्रकारांवरही दबावतंत्र
बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारून दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज सकाळपासून या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून व्हॅक्सिन डेपो येथे उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या दादागिरीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर आय पाटील, मोतेश बार्देशकर, अमोल देसाई, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विधिमंडळ अधिवेशनाविरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करीत असते. या ही वेळी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी ही मागितली होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाने आज सकाळी साडेआठ वाजता तुम्हाला परवानगी नाही, तुम्ही महामेळावा घेऊ शकत नाही, असे सांगून मराठी भाषिकांवर दबाव करण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीपर्यंत तोंडी परवानगी देणाऱ्या पोलिसांनी आज अचानक दादागिरीची भाषा सुरू केली. याशिवाय राज्याचे एडीजीपी अलोक कुमार यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानावर जाऊन सर्व साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. काल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खासदार धैर्यशील माने आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी आदेश बजावला होता. आज महामेळाव्याला परवानगी नाकारून प्रशासनाने दादागिरी सुरू केली आहे. प्रशासनाच्या या मनमानी भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.