Monday , September 21 2026
Breaking News

उघड्या विद्युत केबिनेटमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका

Spread the love

 

बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक स्ट्रीट लाईट खांबांवरील विद्युत केबिनेटची झाकणे तुटलेली किंवा गायब असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष आर. दरेकर यांनी या धोकादायक परिस्थितीकडे राज्य शासन, हेस्कॉम आणि स्मार्ट सिटी प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरेकर यांनी नुकतीच गोगटे सर्कल, रेल्वे स्टेशन रोड, पोस्टमन सर्कल, फोर्ट रोड डबल रोड, धर्मवीर संभाजी चौक सर्कल तसेच सीपीएड मैदान परिसरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अनेक स्ट्रीट लाईट खांबांवरील विद्युत केबिनेट उघडी असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी स्विचेस व विद्युत तारा उघड्यावर दिसत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळा सुरू झाल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दररोज हजारो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचारी, वाहनचालक, वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच भटके प्राणी या मार्गांचा वापर करतात. उघड्या विद्युत यंत्रणेत पावसाचे पाणी शिरल्यास शॉर्ट सर्किट, विजेचा धक्का, आग लागणे तसेच रस्त्यावरील दिवे बंद पडण्याची शक्यता असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.

मुसळधार पावसाच्या काळात स्ट्रीट लाईट बंद पडल्यास अनेक भागांत अंधार होऊन अपघातांचा धोका वाढू शकतो. तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्यास सार्वजनिक निधीवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने सर्व उघड्या विद्युत केबिनेटची दुरुस्ती करून सुरक्षित झाकणे बसवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत तात्पुरती संरक्षणात्मक व्यवस्था आणि इशारा फलक लावावेत, असेही आवाहन संतोष आर. दरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *