बेळगाव : सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सोमवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले.
पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने आज शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाचा सप्ताह अखेरचा दिवस होता. आज सकाळी विधानसभेत नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज चालले. अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे सप्ताह अखेरच्या दिवशी आज बेळगावच्या प्रश्नांवर चर्चा झाली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगावच्या औद्योगिक विकासासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केले. उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनीही बेळगावात संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेली ७०० एकर जमीन ताब्यात घेऊन आयटी पार्क सुरु करण्याची मागणी केली. त्याला उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी समर्पक उत्तर दिले. त्यानंतर अन्य आमदारांनी मांडलेल्या प्रश्नावर कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी व अन्य संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर सभापती विश्वनाथ हेगडे-कागेरी यांनी येत्या सोमवारी सकाळपर्यंत विधानसभेचे कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली.