
निपाणी जैन समाजाचा मोर्चा : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : झारखंडमधील जैन समाजाचे पवित्रक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ करण्याच्या सरकारने घाट घातला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे धार्मिक पावित्र्य अडचणीत आले आहे. याशिवाय गुजरात मधील पालिताना येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची विटंबना उत्तम नाही केली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा आदेश रद्द करून त्याचे पवित्र टिकवावे. शिवाय विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी येथील सकल जैन समाजाने शहरातील विविध मार्गावरून मोर्चा काढून निषेध नोंदवला. शिवाय झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा आदेश मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. समाजाच्या विविध मागणीचे येथील तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यातर्फे केंद्र सरकार, झारखंड व गुजरात सरकारला निवेदन आले. यावेळी झारखंड सरकारचा निषेध नोंदवत जैन धर्माच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
निवेदना मधील माहिती अशी, पालीताना येथील पादुकांची विटंबना करणाऱ्यांविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तात्काळ दोषींवर कारवाई करावी. तेथील सीसीटीव्ही फोडून विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्याच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे. पालीताना परिसरातील अवैध मद्य दुकानांवर कारवाई करावी.
झारखंड मधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ बनवण्यास समाजाचा तीव्र विरोध आहे. पर्यटन स्थळ झाल्यास या ठिकाणी अनेक अनैतिक कृत्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटन स्थळाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सकाळी दहा वाजता येथील गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. गुरुवार पेठ, अशोकनगर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, जुना पी. बी. रोडमार्गे तहसीलदार कार्यालयात आला. धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी जैन समाज बांधवांच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला. सम्मेद शिखरजी हे पर्यटन केंद्र न होता केवळ धार्मिक स्थळ कायम राहणेआवश्यक आहे. या ठिकाणी कर्नाटकातील भाविकांना यात्री निवास बांधण्यासाठी पाच एकर जागा मिळाली आहे. त्यासाठी निधी मंजूर करून लवकरच यात्री निवास बांधकाम होणार असल्याचे सांगितले.
प्रा. पी.पी. शाह यांनी शहा, जैन समाजाची तीर्थक्षेत्रे ही मौजमजा करण्यासाठी नसून या स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी समाजबांधवांनी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. प्रा. कांचन बिरनाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नेमिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण खोडबोळे, चंद्रप्रभू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल कोठाडीया, आदिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय पुरंत यांच्यासह मान्यवर, आजी-माजी नगरसेवक, श्रावण-श्रविका उपस्थित होत्या.