बेळगाव : २३ डिसेंबर हा भूतपूर्व पंतप्रधान तसेच समस्त देशातील शेतकऱ्यांचे श्रध्दास्थान म्हणून प्रचलित असलेले चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून देशभर पाळला जातो. आज दर्श वेळा आमावस्या म्हणजे शेतकरी आपल्या शेतातील बहरलेल्या पिकांची पूजा करण्यासाठी गोड जेवण तयार करुन सहकुटूंब शेतात जाऊन पूजा करतात. हा खरा योगायोग जूळून आला आहे. त्याच धर्तीवर बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास तसेच इतर शेतकरी बंधूतर्फे बायपासमधील पिकाऊ जमिनीत सर्व शेतकरी बंधूनी राष्ट्रीय कृषी दिन साजरा केला. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी कायदे करुन देशातील शेतकऱ्यांना देशोधाडीला लावण्याचे जे षडयंत्र सुरु आहे त्याचा निषेध करत कर्नाटक सरकारने पारित केलेले मारक असे तीन कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव, ऊस दरवाढ, विद्युत खासगीकरण, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तसेच खरीप, रब्बी पिकांवर खराब हवामानाने झालेल्या पिकांची नुकसानभरपाई, लंपीस्किनमध्ये दगावलेल्या जनावरांची भरपाई, पिकाऊ जमिनीत बेकायदेशीर झालेले अतिक्रमण तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात असा सर्वानूमते ठराव करण्यात आला. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना जर सरकार त्रास देत असेल तर रयत संघटनेच्या माध्यमातून लढा देत न्याय मिळवल्याशिवाय रहाणार नाहीत असा निर्धार करत शपथ घेऊन घोषणांनी परिसर दणाणून सोडत सर्वांनी एकमेकांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बेळगाव तालुका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे, रयत संघटना नेते प्रकाश नायक, शेतकरी संघटना महिला जिल्हाध्यक्षा शिवलिला मिसाळे, शेकापचे विलास घाडी, सुभाष चौगले, हणमंत बाळेकुंद्री, भोमेश बिर्जे, गोपाळ सोमनाचे, सुरेश मऱ्याक्काचे, मारुती बिर्जे, लक्ष्मण देमजी,सचिव अनिल अनगोळकर, नितिन पैलवानाचे, भैरु कंग्राळकर, तानाजी हालगेकर, प्रदिप बिर्जे, महिला शेतकरी सविता बिर्जे, शोभा मोरेसह इतर बरेच शेतकरी या कार्यक्रमास हजर होते.