बेळगाव : बेळगाव कृषी विभागाच्यावतीने कृषी दिनानिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या 5 शेतकऱ्यांचा तालुकास्तरीय कृषी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा 23 डिसेंबर हा जन्म दिन देशभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान कै. चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव कृषी विभागातर्फे काल शुक्रवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या निवडक 5 शेतकऱ्यांना तालुकास्तरीय कृषी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये भुजंग घळगू कोरजकर (सावगांव), मनोहर पाटील (कंग्राळी), नागेश मायाप्पा गडे (कणबर्गी), पिराजी गणपती माहूत (गुरमट्टी) आणि यल्लप्पा लक्ष्मण आनंदाचे (होनगा) यांचा समावेश होता. सत्कार समारंभाप्रसंगी बेळगांव जिल्हा कृषी अधिकारी आर. डी. कटगल, राजशेखर भट्ट, मलेश नाईक, सविता परीट, मंजुनाथ हकलदवर, अडत व्यापारी एन. के. पाटील आदींसह कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थीत होते.