बेळगाव : स्मार्टसिटीअंतर्गत बेळगावात सुसज्ज बस स्थानकाचे उद्घाटन नुकताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात आले. या हायटेक बस स्थानकात मराठी भाषेला कुठेच स्थान नाही. त्यामुळे बेळगावसह सीमावासीयांत नाराजी पसरली आहे.
बेळगाव परिसरात बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. त्रिसूत्रीय धोरणानुसार कन्नडसह मराठी भाषेत फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणामुळे कायद्याच्या चौकटीत राहून निर्माण केलेल्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावत बस स्थानकावर मराठी फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे मराठी भाषिक प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर प्रवाश्यांची फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मराठीचा विसर पडला आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आतातरी मराठी भाषिकांनी विकासाच्या भूलथापांना बळी न पडता मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकविणाऱ्या मराठी भाषिक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून मराठीची ताकद दाखविणे गरजेचे आहे.