बेळगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून यावेळी देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता अद्याप मराठी मतदारयादीची छपाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यापैकी बेळगांव ग्रामीण, उत्तर, दक्षिण, खानापूर तसेच निपाणी मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. मराठी भाषिक मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत आहे की नाही हे पडताळून पाहणे कठीण होणार आहे.
प्रत्येक निवडणुकीच्यावेळी प्रशासनाकडून मराठी मतदारयादी मिळविण्यासाठी लढावेच लागते. मराठी मतदारयादी मिळविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला आवाज उठवावा लागतो. मराठी बहुल भाग असलेल्या मतदारसंघात मराठी भाषेतून मतदार यादी देण्यात यावी, अशी केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारला सूचना दिल्या आहेत. मात्र कर्नाटक सरकारकडून या सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
मराठी मतदार यादी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचे आमदार प्रयत्न करणार आहेत की फक्त मराठी माणसाचा मतदानासाठीच वापर करून घेणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.