बेळगाव : ‘समाजात काम करीत असताना डॉक्टरांचे समाजाप्रती जे कर्तव्य आणि जबाबदार्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अडीअडचणीच्या वेळेला डॉक्टरांच्या पाठीशी कर्नाटक मेडिकल कौन्सिल नेहमीच राहील’ अशी ग्वाही कर्नाटक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. कांची यांनी बोलताना दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच हॉटेल आदर्श पॅलेसमध्ये संपन्न झाला. त्याप्रसंगी ते पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आगामी वर्षासाठी डॉ. राजश्री अनगोळ यांची आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष शिंदे यांची सचिवपदी तर डॉक्टर बसवराज बिज्जरगी यांची खजिनदार म्हणून नेमणूक झाली आहे. डॉक्टर पी. व्ही. कांची यांनी या पदाधिकार्यांना शपथ देवविली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना डॉ. राजश्री अनगोळ म्हणाल्या की, ‘विविध रोगांचे निदान लवकर व्हावे यासाठी आम्ही समाजात जनजागृती करणार असून आगामी वर्षात समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविणार आहोत’.
या कार्यक्रमास माजी अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, माजी सचिव डॉ. देवेंद्र पाटील व माजी खजिनदार डॉ. रवींद्र अनगोळ यांच्यासह शहरातील सव्वाशे डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. कांची यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुचित्रा लाटकर यांनी केले.
