बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपण आणि गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे.
बेळगाव महानगर पालिकेच्या अलिकडे झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. सदर प्रभागातील मतदार यादीमध्ये बाहेरील मतदारांची नांवे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या प्रभागामध्ये प्रामुख्याने हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील किमान 1500 लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली त्याचप्रमाणे बेनकनहळ्ळी व आंबेवाडी येथील तुरळक लोकांनी महापालिका निवडणुकीसाठी बेकायदा मतदान केले आहे. तसेच प्रभाग क्र. 32 मधून जवळपास 900 लोकांची नावे 31 प्रभागमध्ये समाविष्ट केले आहेत. या सर्व प्रकारात शेकडो लोकांनी बोगस मतदान केले आहे, असा आरोप प्रभाग क्रमांक 31 मधील पराभूत उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी केला आहे. तसेच याच्या विरोधात दाद मागण्यासाठी बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून यासंदर्भात नगरविकास खाते कर्नाटक राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, निवडणूक निर्वाचन अधिकारी आणि प्रभागातील निवडणूक रिंगणातील उर्वरित चार उमेदवार अशा एकूण नऊ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राजश्री हावळ यांच्यावतीने अॅड. अभय लगाडे काम पहात असून हावळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 20 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील प्रभाग क्र. 52 मधून सायली गुंजटकर, प्रभाग क्र. 41 मधून रतन मासेकर, शिवा चौगुले व आनंद ब्याकुड यांनी देखील महापालिका निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत.
