बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे.
रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या हे आमचे नेते आहेत. आमचे गुरु आहेत. परंतु आजकाल ते खूप खोटे बोलायला शिकत आहेत. काल रायबागमध्ये सिद्धरामय्यांनी म्हटले की, विवेकराव पाटील यांचा काँग्रेसशी संबंध नाही. परंतु मी कोल्हापूर अंबाबाईसमोर शपथ घेऊन सांगतो, कि विवेकराव पाटील काँग्रेसचेच सदस्य आहेत, असे रमेश जारकीहोळी म्हणाले.
मागील विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षातर्फे विवेकराव पाटील यांनी उमेदवारी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु वीरकुमार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विवेकराव पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. यानंतर सिद्धरामय्यांनी विवेकराव पाटील हे काँग्रेससाठी काम करत असल्याचे सांगितले. तर आता विवेकराव पाटील यांचा काँग्रेसशी संबंध नसल्याचे बोलले जात आहे, या वक्तव्याबाबत मी नाराज असल्याचे रमेश जारकीहोळी म्हणाले.
