बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. मंगळवार दि. 7 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षनेते आणि पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे राज्यप्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकास हे ध्येय निश्चित करून विविध स्वरूपातील योजना दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर विकासाचे बिज रोवण्यासाठी भाजप कार्यरत आहे. याबद्दल आता सर्वत्र जागृती झाली आहे. तसेच भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रचाराचा झंझावात मतदार सदस्यांपर्यंत पोहचला आहे. तसेच कवटगीमठ यांच्या कामकाजाबद्दल देखील मतदारांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेवेळी आ. अनिल बेनके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
