बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीचा आग्रह करत कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
बेळगावमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथील गार्डनमध्ये कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने आपल्या कुटुंबियांना उद्योग आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, आरोग्य सुविधा यासह इतर सुविधा मिळाव्यात, अशा विविध मागण्यांचा आग्रह करत आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरगेप्पा शेट्टर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी बलिदान दिले आहे. काहींनी तुरुंगवास भोगला आहे. अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांची कुटुंबे उपेक्षित आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना विविध क्षेत्रात आरक्षण मिळावे आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे असून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी कुटुंबासमवेत आंदोलनात सहभाग घेतला.
