(६)
बेळगाव : निवडणुका येती घरा तोची दिवाळी दसरा… अशी काहीशी गत सध्या समाजामध्ये निर्माण झाली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सामान्य जनता फक्त राजकारणात अडकून पडली आहे आणि याचाच फायदा नेते मंडळी करून घेताना दिसतात. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विशेषतः बेळगाव लोकसभा मतदारसंघात कमालीची उलथापालथ दिसून येत आहे. तीन वेळा सातत्याने भाजपचा विजय प्राप्त झालेला मतदारसंघ “अब की बार 400 पार”मध्ये काँग्रेसच्या गळी लागतो की काय अशी अवस्था झाली आहे. अश्यात भाजपने माजी मुख्यमंत्री व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवारी करून आलेले जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे भाजपचा निवडणुकी आधीच पराभव होतो की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. पण सर्व घडामोडी एकीकडे चालू असताना मात्र बेळगावच्या स्थानिक वातावरणात वेगळ्याच गोष्टींची चर्चा रंगत आहे. भाजपशी जवळीक असणाऱ्या एका माजी महापौरांनी भलतेच उपक्रम राबविल्याची चर्चा ऐकू येत आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी एक माजी विधानपरिषद सदस्य इच्छुक असल्याने त्यांच्या दिमतीला हे माजी महापौर सध्या चपला झिझवत आहेत. स्थानिक उमेदवार असावा म्हणून चालविलेल्या या अभियानात चक्क बेळगावच्या इतर माजी महापौर व उपमहापौर यांना वेठीस धरले जात आहे आणि या भाजपशी जवळीक असणाऱ्या नेत्याने त्यात पुढाकार घेतल्याचे समजते. माजी विधानपरिषद सदस्याला लोकसभेचे तिकीट देण्यात यावे यासाठीचे पत्र तयार करून दिल्ली दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत सदर पत्रावर इतर माजी महापौर आणि उपमहापौर यांची सही मिळविण्यासाठी महाशय कालपासून भटकताना दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा महाशय भाजपात जातात की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अश्या लोकांमुळे निष्ठावंत मराठी माणसाच्या कार्यावर प्रश्न चिन्ह उभे होतात. पण यांच्या सह्यांच्या मोहिमेला विरोध सुद्धा झाल्याचे समजते. समितीनिष्ठ असणाऱ्या दोन माजी महापौरांनी अश्या पत्रावर सही करण्यास नकार दिला आहे. पण निवडणुका आल्या की तळ्यातमळ्यात करणाऱ्या या लोकांना मराठी माणसाने ओळखून त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवला पाहिजे.