Wednesday , July 9 2025
Breaking News

बेळगावात जगदीश शेट्टर यांचे उत्स्फूर्त स्वागत!

Spread the love

 

बेळगाव : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या वतीने बेळगावात बी. एस. येडियुरप्पा यांनी जोरदार प्रचार केला.
लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सकाळी हिरेबागेवाडी टोलनाक्यावरून बेळगाव गाठले. किल्ला दुर्गादेवी मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. पक्षाचा लोगो असलेले भगवे फेटे, शाल परिधान करून पक्षाचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी “अब की बार मोदी सरकार, अब की बार चारसो पार, हर हर मोदी, घर घर मोदी, भारतमाता की जय, हमारा नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राणी चन्नम्मा की जय” अशा घोषणा दिल्या.
खुल्या जीपमध्ये भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर, बी. एस. येडियुरप्पा उभे राहून मतदारांना अभिवादन करत होते.
अशोक चौकातून संगोळी रायण्णा चौक मार्गे न्यायालयात आल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी न्यायालयाच्या आवारातील क्रांतिकारक संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. चन्नम्मा चौकात आल्यानंतर राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नंतर राणी चन्नमा सर्कल येथील गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर कॉलेज रोड ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत पदयात्रा काढून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, कपिलेश्वर मंदिरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गोवावेस येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. त्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी सुचवले आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. ते किमान दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, यात शंका नाही. पण आपण उदासीन राहू शकत नाही. सर्वांनी त्यांच्या विजयासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
उमेदवार जगदीश शेट्टर बोलताना म्हणाले की, आमचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा काल रात्री दावणगेरेहून बेळगावात दाखल झाले. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण मिळून ही निवडणूक लढवू. बेळगाव ही माझी जन्मभूमी आहे. निवडून आल्यानंतर विकासासाठी रात्रंदिवस काम करण्याचे आश्वासन दिले. या रॅलीत भाजप नेते एन. रविकुमार, खासदार मंगला अंगडी, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह भाजपच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *