बेळगाव : आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकसंघ आहोत. सर्व मतभेद दूर झाले आहेत, असे माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले.
बेळगावात आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. मी येथे खूप काम केले आहे. मी आतापासून इथेच राहीन. काँग्रेसवाले मी बाहेरचा आहे, असा अपप्रचार करत आहेत, त्याची काळजी करू नका’, मी मुख्यमंत्री असताना येथे सुवर्णविधान सौधचे उद्घाटन झाले होते. त्याशिवाय दोन वेळा मी बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. येथे सिंचन योजनांसाठी मी पाठपुरावा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक स्तरावर काम केले आहे. बेळगावशी माझे नाते ३० वर्षांहून अधिक जुने आहे. मी काही बाहेरचा नाही, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत यासाठी ही निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. सुरेश अंगडी यांचे काम पुढे सुरु ठेवणार असल्याचे सांगून आम्ही बेळगाव-कित्तूर बेंगळुर थेट रेल्वे मार्गावर लवकरात लवकर योजना आखून काम करू आणि बेळगाव, धारवाड आणि हुबळी हे तिहेरी शहर म्हणून विकसित करू, असे शेट्टर म्हणाले.
काँग्रेसचे लोक आपल्याला बाहेरचा उमेदवार म्हणून अपप्रचार करत असल्याच्या मुद्द्यावर, अजय माकन यांना कर्नाटकातून राज्यसभा सदस्य बनवण्यात आले, सोनिया गांधी बेळ्ळारीतून तर इंदिरा गांधी चिक्कमंगळूरमधून विजयी झाल्या होत्या. हे सगळे बाहेरचे नाहीत का? मला बाहेरचे म्हणणे असंबद्ध आहे. मोदींचे कर्तृत्व लोकांसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतःला मागासवर्गीयांचे नेते म्हणवतात. पण मोदींनी आपण मागासवर्गीय नेते आहोत असे कधीच म्हटलेले नाही. वंचितांचा नेता असे कुठेही म्हटले नाही. मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. काँग्रेसला पराभवाची भीती वाटू लागली आहे. तसे त्यांचेच आमदार उघडपणे सांगत आहेत. निवडणुकीनंतर सरकार पडेल, असा दावा त्यांनी केला.
भगवी शाल घातली म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना कोणी माफ करू शकत नाही. काँग्रेसने गोहत्या बंदी आणि धर्मांतराला बंदी घालणारा कायदा मागे घेतल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला जात असताना काँग्रेस नेते, त्यांचे सरकार मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, राजशेखर डोणी, खासदार मंगला अंगडी, एम. बी. जिरली यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.