Sunday , September 8 2024
Breaking News

कर्नाटकात ‘घराणेशाही’चा सर्वपक्षीय उदो उदो..!

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे.
काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका चिक्कोडी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल बेळगावमधून तर बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंदारे यांचा मुलगा सागर बिदरमधून, दक्षिण बंगळुरु मतदारसंघातून रामलिंगा रेड्डी यांची कन्या सोम्या रेड्डी, बागलकोटमधून मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता निवडणूक रिंगणात आहेत. दावणगेरेमधून मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार प्रभा मल्लिकार्जुन निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे सासरे शामनूर शिवशंकराप्पा हे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान यांचे चिरंजीव मन्सूर अली खान मध्य बंगळुरुमधून निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने या निवडणुकीत आघाडी केली आहे. मागील निवडणुकीत जनता दलाने काँग्रेस सोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. आता भाजप २५ जागा लढवीत असून जनता दलाला तीन जागा सोडण्यात आलेल्या आहेत. या तीन जागांमध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंड्यामधून तर त्यांचे पुतणे प्रज्वल रेवण्णा हसन मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. रेवण्णा मागील निवडणुकीत विजय संपादन केला होता. कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल पक्ष म्हणजे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी या पिता-पुत्रांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. देवेगौडा यांचे जावई प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ बंगलोर ग्रामीणमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवीत आहेत. ते गत निवडणुकीतील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांच्याविरुद्ध उभे आहेत.

काँग्रेस आणि जनता दलाच्या पावलावर पाऊल टाकीत घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने देखील घराणेशाही सोडलेली नाही. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांना बाजूला केल्याने भाजपचा दारुण पराभव झाला, असे मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी निवडलेले आहे. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव खासदार डी. वाय. राघवेंद्र यांना शिमोगातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेले आहे. त्यांचे दुसरे चिरंजीव डी. वाय. विजेंद्र आमदार आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण आहेत. शिमोगाचे ज्येष्ठ भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी भाजपमधील घराणेशाहीला विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांची नाराजी त्यांच्या चिरंजीवांना हावेरीतून उमेदवारी दिली नाही ही आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना बंगळुरु उत्तरमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे आणि तेथे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करदलांजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीमती करदलांजे या येडीयुरप्पा यांच्यात घनिष्ट असल्याचे सांगण्यात येते.

मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई रिंगणात

काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने करीत असताना कर्नाटकातील सर्वच पक्षांनी घराणेशाहीचाच मार्ग पत्करला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून जावई राधाकृष्ण दोडमनी यांना उमेदवारी दिली आहे.

तीन माजी मुख्यमंत्री

कर्नाटकाचे तीन माजी मुख्यमंत्री निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनता दलाचे कुमार स्वामी मंड्यामधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे बसवराज बोम्मई हावेरी मतदारसंघातून तर जगदीश शेट्टर बेळगावमधून निवडणूक रिंगणात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन आणि इतराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर

Spread the love  बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *