बेळगाव : चक्क न्यायदेवतेच्या मंदिरासमोरच अंधश्रद्धेतून करणीबाधेचे साहित्य ठेवल्याचा खळबळजनक प्रकार आज बेळगावात उघडकीस आला.
बेळगावातील चन्नम्मा चौकाजवळील नव्या जेएमएफसी न्यायालय कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुलालाने माखलेला नारळ, लाल-काळे पाणी भरलेले प्लास्टिक ग्लास, तांदूळ, काळ्या बाहुल्या, लिंबू असे चित्रविचित्र साहित्य एका पत्रावळीत भरून अज्ञातांनी ठेवून दिल्याचे आज सकाळी उघडकीस आले. कोर्टात येणारे वकील, पक्षकार व कर्मचाऱ्यांना हे पाहून धक्काच बसला.
यासंदर्भात बोलताना एका वकिलांनी सांगितले की, आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. ज्ञान-विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. तरीही असे प्रकार अंधश्रद्धेतून घडतात, हे खेदजनक आहे. न्यायालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे फुटेज तपासून हे साहित्य ठेवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
ऍडव्होकेट महादेव शहापूरकर म्हणाले की, कोर्टातील एखाद्या केसमध्ये आपल्या बाजूने निकाल यावा या हेतूने कोणीतरी मूर्खांनी हा प्रकार केला आहे. पण अशी करणीबाधा करून काही सध्या होत नाही. उलट त्याचे विपरीत फळ असे करणाऱ्यांना मिळते. अशा प्रकारातून काही मिळाले असते तर कोणी कामधंदाच केला नसता. त्यामुळे अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृत्ये कोणी करू नयेत असे आवाहन त्यांनी केले.