बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (दि. ३०) धर्मवीर संभाजी उद्यानात जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्व माहिती दिली. आंदोलन करताना घडलेल्या घडामोडी आणि राजकीय विरोधाबाबत भाष्य केले.
ते पुढे म्हणाले, बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आता जेलमध्ये जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांसारखे लढायला शिका. एकदा विषय हाती घेतला तर त्यातून माघार घेणार नाही. मैदानाला पाठ दाखवणार नाही, असे ठरवले तरच विजयाचा गुलाल आपल्यावर पडेल. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय मरण डोळ्यासमोर ठेवूनच मी हातात घेतला होता. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला संपवण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन काम केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.
एकदा लढा हातात घेतला की माघार घेता येणार नाही. बेळगावच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार या साऱ्या बाबी तपासून आंदोलन हाती घ्यावे लागणार आहे. सीमाभागातील मराठा समाजाच्या प्रत्येक घरातील माणसाने रस्त्यावर उतरले तर महाराष्ट्रातील मराठा समाज तुमच्या पुढे कायम राहील. त्यासाठी तुमच्यात एकजूट असणे आवश्यक आहे. मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. मी कोणत्याही पक्षाला फायदा करुन देत नाही. फक्त माझ्या समाजाला माझा फायदा झाला पाहिजे, असाच विचार करतो. सर्व मराठा समाज एकत्र आला तर बेळगावचा प्रश्न दोन दिवसाच्या आत संपून जाईल. पण त्यासाठी तुमच्यापासून सुरुवात करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाने राजकारण बाजूला ठेवले तरच पुढची पिढी संघर्षापासून दूर राहील. त्यासाठी आज तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. सीमाप्रश्न अनेक दशकांचा आहे. वाटते तेवढे सोपे नसले तरी तुमची एकजूट झाली आणि तुम्ही सावधगिरीने काम केले तर या प्रश्नाचा निकाल लागण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या या प्रश्नात महाराष्ट्र कायम तुमच्या सोबत असणार आहे, अशी ग्वाही जरांगे यांनी दिली.
रणजीत चव्हाण-पाटील यांनी स्वागत केले. गुणवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर रमाकांत कोंडुस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, प्रकाश मरगाळे, एम. जी. पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, अंकुश केसरकर यांनी जरांगे यांचा सत्कार केला. तत्पूर्वी कराडचे ऍड. संभाजी मोहिते यांनी छत्रपती शाहू महाराजांवर व्याख्यान दिले.
प्रत्येक मोहिमेच्या, संघर्षाला ,लढवय्यांच्या इच्छा शक्तीला मोर्हक्यांचा ,”विश्वासपण ढाली सारखा लाभला पाहिजे.
.वंदेमातरम . ।
🙏