बेळगाव : अल्पवयीन मुलीची सतत छेड काढत असल्याच्या रागातून मुलीच्या बापाने दोन भावांचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी सौंदत्ती तालुक्यात घडली.
मायाप्पा सोमाप्पा अळगोडी (वय २०) व यल्लाप्पा सोमाप्पा अळगोडी (२२, दोघेही रा. दुंडनकोप्प, ता. सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. फकिराप्पा (वय ४८, रा. दुंडनकोप्प) असे संशयिताचे नाव आहे. मुरगोड पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता कारागृहात रवानगी केली.
याबाबत माहिती अशी की, अळगोडी व फकिराप्पा ही दोन्ही कुटुंबे आजूबाजूला राहतात. फकिराप्पा यांना १७ वर्षांची मुलगी असून ती कॉलेजमध्ये शिकते. मोलमजुरी करणारा मायाप्पा हा सतत तिच्या मागे लागत होता. ती कॉलेजसाठी बाहेर पडली की तिच्या मागे लागत होता. मायाप्पाच्या या सततच्या त्रासामुळे सदर युवतीने ही बाब त्यांच्या घरी सांगितली होती.
यापूर्वी फकिराप्पाने आपली मुलगी अजून लहान आहे, तिला उगीच त्रास देऊ नकोस, असे सांगितले होते. वारंवार सांगूनही मायाप्पाच्या वागण्यात फरक पडत नव्हता. मंगळवारी मायाप्पाने फकिराप्पाच्या घरासमोर जाऊन भांडण काढले. तुझ्या मुलीशी आपल्याला लग्न करायचे आहे, करून देणार की नाही, असा दम भरला. त्यामुळे फकिराप्पा चिडला. त्याने घरातील चाकू आणून रस्त्यावर थांबलेल्या मायाप्पावर सपासप वार केले. घाव वर्मी बसल्याने मायाप्पा जागीच ठार झाला. यावेळी मायाप्पाचा थोरला भाऊ यल्लाप्पादेखील येथेच होता. मायाप्पाला मारताना तो फकिराप्पाला अडवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावरही वार त्याने केले. तोदेखील गंभीर जखमी झाल्याने गावातील लोकांनी त्याला रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर जखमी असल्याने बुधवारी सकाळी १० वा. त्याचाही मृत्यू झाला.
एसपींसह पोलिस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच मुरगोडचे पोलिस निरीक्षक आय. एम. मठपती, उपनिरीक्षक हिरेगौडर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. खुनानंतर फकिराप्पा येथेच बसून होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनीही घटनास्थळी व पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली. याची नोंद करून घेतली असून, आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. पुढील तपासाचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.