हैदराबादच्या विजयासह मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघावर २०२२नंतर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. लखनौनं दिलेलं १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादने लीलया पार केलं. हार्दिक पंड्या या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईची कामगिरी सर्वसाधारण झाली.
लखनौनं प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांची मजल मारली. कर्णधार के. एल. राहुल, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनस, कृणाल पंड्या यांना मोठी खेळी करता आली नाही, पण आयुश बदोनी आणि निकोलस पूरन यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूत ९९ धावांची भागीदारी केली. पूरनने २६ चेंडूत ४८ तर बदोनीने ३० चेंडूत ५५ धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १२ धावांत २ विकेट्स पटकावल्या.
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी तडाखेबंद सलामीची भागीदारी करत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हेडने ३० चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. अभिषेकने २८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. या दोघांच्या झंझावातामुळे १० विकेट्स आणि ६२ चेंडू राखून प्रचंड फरकाने विजय साकारला. अवघ्या पाऊण तासात ट्रॅव्हिस-अभिषेक जोडीने लखनौच्या लक्ष्याचा फडशा पाडला.