Sunday , July 26 2026
Breaking News

पूर आल्यास ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सक्त सूचना

Spread the love

 

बेळगाव : गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सुचना देण्यात केल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळपासूनच अलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग 2 लाख क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातून येणाऱ्या नदीच्या पाण्यासंदर्भात 24 तास लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
संततधार कोसळत असलेला पाऊस आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय बोटी नेहमी तत्पर ठेवाव्यात. गरज पडल्यास बोटी भाड्याने घेण्यासाठी पावले उचलावीत. पाच बोटी खरेदी केल्या जाणार असून अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्या वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नदीकाठच्या गावांची तहसीलदारांकडून माहिती घेतल्यानंतर कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा नदी काठच्या संभाव्य पूरग्रस्त गावांमध्ये तहसीलदार, नोडल अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सतत दक्षता ठेवावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
मंगवती, जुगुळ, शिरगुप्पी, कुसनाळ, बालाजीवाडा, मुळवाड, उगार, यडूर, मांजरी, झुंजारवाड, नागनूर पीके, बेलवाडा, भीमशी, कोडणी, भोज, होनरगी या गावांच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आले आहे. घटप्रभा नदीच्या पाण्यामुळे पूर येणाऱ्या भागाचे निरीक्षण करावे, असे त्यांनी सांगितले. पावसाने खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *