खानापूर : लोंढा-वास्को लोहमार्गावरील दूधसागर ते सोनवणेच्या मध्ये मालवाहू रेल्वेचे 16 डबे घसरले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
दूधसागर ते सोनवणे या मार्गावरील 15 नंबर बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली. वास्को येथून तोरंगळ होस्पेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन निघालेल्या मालवाहू रेल्वेचे 16 डबे येथील लोहमार्गावर घसरले. त्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमध्ये येथील लोहमार्गाचे देखील नुकसान झाले आहे.
त्यामुळे या मार्गावरून धावणारी गोवा तिरुपती ही ट्रेन रद्द करण्यात आली असून, सायंकाळी जाणारी गोवा एक्सप्रेस ही अन्य ठिकाणाहून वळवणार असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे, तर रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आता सदर मार्ग मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.