बेळगाव : सालाबादप्रमाणे बेळगाव शहर व उपनगरात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी उपस्थित होणाऱ्या विविध मुद्यांसाठी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन कुमार गंधर्व येथे नुकतेच निवेदन देण्यात आले.
गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरातील व उपनगरातील विविध मंडळांना विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात या पार्श्वभूमीवर लोकमान्य गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यात असे नमूद केले आहे की, ज्या मंडळांनी गणेशोत्सवासाठी परवानगी रितसर घेत आहे त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या वर्षात नवीन कोणत्याही प्रकारची अटी घालू नये.
शहरातील व प्रमुखतेने श्री विसर्जन मिरवणुक मार्गाचे रस्ते त्वरीत खड्डे दुरुस्त करावेत. प्रत्येक रस्त्यावर अनेक खड्डे आहेत ते दुरुस्त व्हावेत, विसर्जन मार्ग नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, टिळक चौक, कपिलेश्वर रोड हा संपूर्ण रस्ता मिरवणुकीचा दृष्टिने अत्यंत महत्वाचा आहे. यावर दोन तीन ठिकाणी डांबरीकरण रस्त्यावर दुरुस्तीचे काम करणे जरूरीचे असून शहरातील व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील दुरुस्तीचे काम त्वरीत करण्यात यावे.
सार्वजनिक गणेश मंडळांना सालाबादप्रमाणे देण्यात येणाऱ्या परवानग्या एक खिडकीची योजना या तशाच ठेवण्यात याव्यात. मिरवणूक संपेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी. ज्या मंडळाच्या गणेश उत्सवाचे आगमन सोहळे असतील त्या मंडळाच्या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात यावेत व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. गणेश मंडळांना परवानगी देतांना कागदपत्रांसाठी अडवणुकीचे धोरण न बाळगता सर्व परवानग्या ह्या “एक खिडकी योजना” अंतर्गत देण्यात याव्या. उत्सवादरम्यान कुठे ही अंधार राहू नये. सर्व स्ट्रीट लाईट व काही ठिकाणी विशेषतेने एलईडी, हेलोजनची व्यवस्था करावी. शहरात व मुख्य सडकेवर व काही मोठे गणेशमंडळाच्या जवळपास लहान मोठे अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच मिरवणुकी मार्गावरील जीर्ण झालेल्या वृक्षांची दखल घेऊन काटछाट करून होणारे संभव धोके टाळावेत. खेड्यापासून येणाऱ्या भक्तांना विशेष बस सेवा पुरवावी.
सर्व परवानग्या देण्याचे अधिकार त्या त्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात यावे. पोलीस आयुक्तालयामार्फत एक असा अधिकारी नेमावा कि जो सर्व गणेश मंडळांच्या अडचणी दूर करू शकेल. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक मनपा गट नेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, रवी कलघटगी, नितीन जाधव, प्रवीण पाटील, राजकुमार खटावकर, अजित जाधव, आदित्य पाटील, अरुण पाटील, गजानन हांगीरगेकर आदी उपस्थित होते.