जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचे महत्त्व जगाला कळावे यासाठी, कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले आहे. मानवी साखळी उपक्रमाअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 335 किलोमीटरची मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, बैलहोंगल, बेळगाव तालुका, बेळगाव शहर, कित्तूर येथे ठरवून दिलेल्या ठिकाणी 335 किलोमीटर अंतराची मानवी साखळी बनविण्यात येणार आहे.
या मानवी साखळीसाठी प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांवर कामाचे नियोजन सोपविण्यात आले आहे. मानवी साखळी उपक्रमात सरकारी अधिकाऱ्यांसह विविध संघ संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य सहभागी होतील.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मानवी साखळी उपक्रमात बेळगाव जिल्ह्यातून एक लाख वीस हजार लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. मानवी साखळी दरम्यान रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा होऊ नये याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. मानवी साखळी उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीवर प्रत्येक पाचशे मीटर आणि एक किलोमीटर अंतरावर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बेंगलोर विधानसभेत मानवी साखळीला चालना देतील. त्याचबरोबर बेळगावच्या सुवर्णसोध येथेही मानवी साखळी आयोजनासाठी विशेष कार्यक्रम होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.