‘रयत’चे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; पदाधिकाऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याचा नफा व तोट्याची सत्य माहिती सभेत याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहे. माहिती न दिल्यास कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा काय करता रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. गुरुवारी (ता.१२) दुपारी आयोजित रयत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, सन २००८ पासून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू असल्याचे आतापर्यंतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सांगितले आहे. तर मग साखर कारखाना तोट्यात असेल तर नुकसानीचे कारण स्पष्ट करावे. साखर उत्पादन, सहनिर्मिती, इथेनल उत्पादन किती आणि खर्च किती झाला आहे. वार्षिक अहवालात अध्यक्षांच्या भाषणानुसार वित्तीय संस्थांकडून २८२ कोटीचे कर्ज आणि तीन वित्तीय संस्थांकडून १५० कोटीचे खेळते भांडवल दाखवण्यात आले आहे. वरील संस्थांनी वरील रकमेपैकी प्रत्येकासाठी आकारलेले व्याज दर स्वतंत्रपणे जाहीर करावे. सन २०२३-२४ चा वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च ४०.३३ लाख दाखवला आहे. प्रत्येक वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कॉल डिपॉझिट रकमेचा तपशील आणि व्याजदर स्वतंत्रपणे द्यावा.
कारखान्याची वार्षिक सभा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक सभासदांना वार्षिक अहवाल मिळालेला नाही. कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती आहे. कायमस्वरूपी, हंगामी, कंत्राटी किती कामगार कार्यरत आहेत.२०१८ नंतर कायमस्वरूपी आदेश दिलेल्या कामगारांची माहिती द्यावी. गेल्या दोन वर्षांत कंत्राटी वेतनावरील किती कामगार राजीनामा न देता गैरहजर राहिले की काढण्यात आले. डिस्टिलरी कर्जासाठी केंद्र सरकारकडून ५ टक्के व्याजासाठी किती रक्कम मिळते. कारखान्याला “ज्योती बाजार”कडून किती भाडे मिळाले आहे. शिवाय इमारतीच्या बांधकामाची किंमत किती आहे.
कारखान्याकडे विस्तारासाठी उसाची उपलब्धता आहे की नाही. २०२३ -२४ साठी व्याज खर्च ४८ कोटी आहे. या व्याजाचा तपशील प्रत्येक वित्तीय संस्थेला स्वतंत्रपणे द्यावा. व्याजाचा भार आणि तोटा कमी करण्यासाठी लेखा परीक्षकाच्या कोणत्या शिफारशी आहेत. कारखान्याने २०१३-१४मध्ये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून १०० रुपये पीएमटी ठेव म्हणून कापले आहेत. कारखान्याने व्याजासह रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत करावी यासह विविध माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत द्यावी अशी मागणी राजू पवार यांनी केली आहे.
बैठकीस सर्जेराव हेगडे, सुनील पाटील, सागर हावले, सतीश किल्लेदार, विश्वनाथ किल्लेदार, प्रवीण सुतळे, बाबासाहेब पाटील, आप्पासो पाटील, मयूर पोवार, सागर पाटील, पिंटू लाड, शिवाजी वाडेकर, चिनू कुळवमोडे, एकनाथ सादळकर, नितीन कानडे, बबन जामदार, बाळासाहेब ऐवाळे, रमेश कोळी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.