नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्या आली आहे. यानुसार, आज दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी सीताराम येचुरी यांचे निधन झाले. श्वसनमार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे आणखीन क्लिष्ट अशा व्याधी निर्माण झाल्या होत्या, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. “कॉमरेड येचुरी यांच्यावर सर्वोत्तम उपचार आणि त्यांची चांगली काळजी घेतल्याबद्दल आम्ही एम्सचे डॉक्टर, नर्स आणि संचालकांचे आभार मानतो. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ व इतर तपशील लवकरच कळवण्यात येतील”, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.