Thursday , April 16 2026
Breaking News

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन

बंगळूर : श्री आदिचुंचनगिरी मठाने मांडलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन केल्यास ‘विकसित भारत’चा मार्ग अधिक सोपा आणि व्यवहार्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नागमंगल तालुक्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. हे मंदिर मठाचे दिवंगत पीठाधीश्वर बालगंगाधरनाथ स्वामी यांचे स्मारक असून त्यांनी २४ सप्टेंबर १९७४ ते १३ जानेवारी २०१३ या कालावधीत सेवा बजावली होती.

यावेळी पंतप्रधानांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळले. उद्घाटनापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरने तपोवन येथे आगमन करून ज्वालापीठाला भेट दिली. येथे गुरु गोरखनाथांनी प्राचीन काळी तपश्चर्या केल्याची मान्यता आहे. तसेच त्यांनी श्री कालभैरव मंदिरातही पूजा केली.

नऊ तत्त्वांवर भर

मोदी यांनी मठाने सांगितलेल्या नऊ तत्त्वांचा विशेष उल्लेख केला. यात पाणी संवर्धन, आईच्या नावाने वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता, स्वदेशी उत्पादनांचा वापर, देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन, रसायनमुक्त नैसर्गिक शेती, मिलेट्ससह आरोग्यदायी आहार, योग-खेळ-फिटनेसचा अवलंब आणि गरजूंची सेवा यांचा समावेश आहे.

यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे ‘रागी मुद्दे’ लोकप्रिय करण्यासाठी कौतुक केले. मिलेट्सचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणासारख्या समस्यांवर मात करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मठाची परंपरा आणि समाजकार्य

मठाचा जवळपास २००० वर्षांचा वारसा असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, भारत ही प्राचीन संस्कृती टिकवून ठेवणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी एक आहे. “मठ नेहमीच समाजाशी जोडलेला राहिला आहे. आमच्या सरकारचेही उद्दिष्ट लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे आहे. ‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे सन्मानपूर्वक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनावर भर

आदिचुंचनगिरी परिसर हा मोरांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, “मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असून तो आपल्या संस्कृतीशी निगडित आहे. मठ पर्यावरण संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”

आध्यात्म आणि विकासाचा संगम

ते पुढे म्हणाले की, मठ तत्त्वज्ञानासोबत तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन देत आहे. बालगंगाधरनाथ स्वामी यांनी सेवेला नवे परिमाण दिले, तर निर्मलानंदनाथ स्वामी यांनी सर्वसमावेशक विकासाला गती दिली आहे. मठातील संत समाजाच्या समस्यांची जाणीव ठेवून ग्रामीण युवकांना सक्षम करत आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री एच. डी कुमारस्वामी, शोभा करंदलांजे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बसवजय मृत्युंजय स्वामीजींवरील सर्व आरोप खोटे : तक्रारदार महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध

Spread the love  विजापूर : बसवजय मृत्युंजय स्वामीजींविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या त्रिवेणी नावाच्या महिलेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *