बेळगाव : मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर सरकारने बेळगाव शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि ब्लॅक कमांडोचे पथसंचलन काढण्यात आले.
गणेश चतुर्थीचा एक भाग म्हणून शहरातील विविध वसाहती आणि गल्लीत स्थापन करण्यात आलेल्या सुमारे ३७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या मिरवणुकीचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून आणि शेजारील राज्यातून लाखो लोक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलीस अधिक सतर्क राहतील. मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी सात डीसीपी, २५ डीवायएसपी, ८८ सीपीआय, १४२ पीएसआय, ३०० एएसआय, २८०० कॉन्स्टेबल, ४०५ होमगार्ड, दहा केएसआरपी पथके, ८ जलद कृती दलांसह एकूण ३००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
बेळगाव शहर, जिल्हा, विजयपूर, धारवाड, बागलकोट या जिल्ह्यांतून पोलिस कर्मचारी येणार आहेत. तसेच २०० सीसीटीव्ही, हॅन्डी कॅमेरे आणि ड्रोनचा वापर गणेश विसर्जन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.