विविध कार्यक्रम : पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न
निपाणी (वार्ता) : गणरायाच्या आगमनानंतर गेले ५ दिवस घरोघरी गणरायाचे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. सुखकर्ता असलेल्या श्रीगणरायाला गुरूवारी (ता. १२) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी निरोप दिला. यावेळी नगरपालिका प्रशासन आणि दौलतनगर येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी प्रयत्न करण्यात आले.
गेल्या ५ दिवसांत नियमित पूजाअर्चा, आरती, महाप्रसाद अशा माध्यमांतून सर्वांनी सुख, शांती लाभू दे, महागाईचे संकट दूर होऊ दे,अशी प्रार्थना गणेशासह गौरीला केली. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी निर्माल्य गोळा करण्यासाठी नगरपालिकेसह काही सामाजिक संस्थांनी पथके निर्माण केली होती.
येथील दौलराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे खणीजवळ गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. याशिवाय साखरवाडीतील हवेली तलाव, अंमलझरी रोड आंबेडकरनगर जवळील खण, रामनगर, राष्ट्रीय महामार्ग परिसरातील खणीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही गणपतींसह गौरी, शंकरोबाचे विसर्जन झाले. शासकीय कार्यालय, घरगुती श्रीमूर्तीचे दुपारी ४ नंतर विसर्जनास निघाल्या. सायंकाळी ५ नंतर विसर्जनास जाणाऱ्या मूर्तीची संख्या वाढली. खण व तलावाजवळ प्रकाशाची सोय केल्याने रात्री उशिरापर्यंत विसर्जनासाठी गर्दी होती. काहींनी दुचाकी, चारचाकी वाहनांसह रिक्षातून विसर्जनासाठी मूर्ती नेल्या. गणेश विसर्जन स्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बंदोबस्त ठेवला होता.
——————————————————————
पारंपरिक वाद्यांचा गजर
गणेश विसर्जनासाठी शहरासह ग्रामीण भागातील घरगुतीसह मंडळांनी ढोल – ताशे, सनई, चौघडा, करडीढोल, धनगरीढोल, झांजपथक, बँडपथक, भजन दिंडीसह पारंपरिक वाद्यांचा गजर केला.