Tuesday , June 18 2024
Breaking News

समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करणारा साहित्यिक डॉ. अनिल अवचट : प्राचार्य डॉ. आनंद मेणसे

Spread the love

प्रा. एन. डी. पाटील व डॉ. अनिल अवचट व सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली : प्रगतिशील लेखक संघ, समाजवादी प्रबोधिनी, साम्यवादी परिवार, एल्गार सा. सा. परिषदतर्फे व्याख्यान व कार्यक्रमाचे आयोजन

बेळगांव (प्रा. एन. एन. शिंदे) : आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं जीवनात शिकत राहून परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या विषयांचे चौफेर ज्ञान घेण्याची लालसा प्रत्येकांच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी. आजच्या काळात जगत असताना आपण सर्व नीतिमूल्ये विसरत चाललो आहोत; ती जोपासून वाढवली पाहिजे. व्यसनांनीं भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली आणि आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून अनेक लोकं जोडली. वास्तववादाकडून परिवर्तनाकडे वाटचाल करणारा साहित्यिक डॉ. अनिल अवचट समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करून समाजाला दिशा देण्याचे कार्य अखंड अविरत केले आहे. समाजामधील वास्तविकतेचे वेळोवेळी लेखन करून समाजभान जागृत करण्याचे आव्हानात्मक जोखमीचे नेहमी काम आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. चळवळीतून माणूस प्रगल्भ होतो हे दाखवून दिले; याच प्रमाणे नव्या पिढीने समाजसेवेचे व्रत आत्मसात करून सेवा करण्याची जिज्ञासा मनामध्ये निर्माण करायला हवी. प्रा. एन. डी. पाटील, डॉ. अनिल अवचट, सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या श्वासाच्या अखेरपर्यंत कामं केली; आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं. माणूस हाच मनस्वी चिंतनाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून प्रत्येकांच्या जीवनात आनंद द्विगुणित कसा होईल हेच पाहिले. लेखनातून आणि व्याख्यानातून सतत समाज प्राबोधन करत राहिले. आपण आणि त्यांची पत्नी डॉक्टर असूनदेखील आपल्या दोन्हीं मुलींना झोपडपट्टीतल्या जिल्हा पंचायतीच्या शाळेत मराठी माध्यमातून मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देऊन प्रवेश मिळविला मातृभाषेचे पटवून दिले; आणि जातीभेदाच्या सीमारेषा मोडून काढल्या. नवा आदर्श जगापुढे निर्माण केला, असे प्रतिपादन जी. एस. एस. पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी केले.

प्रगतिशील लेखक संघ बेळगाव, समाजवादी प्रबोधिनी बेळगांव, साम्यवादी परिवार , कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ बेळगांव, एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार दिनांक 28/01/2022 रोजी रामदेव गल्ली येतील गिरीष कॉम्प्लेक्सच्या शाहिद भगतसिंग सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “मराठी साहित्यातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे जीवनकार्य आणि सामाजिक बांधिलकीतून प्रबोधन चळवळ” या विषयांवर जी. एस.एस. पदवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक, बेळगावचे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी उपस्थित होते.

व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, ॲड. अजय सातेरी, आनंद कानविंदे, कृष्णा शहापूरकर, शिवलिला मिसाळे, मधू पाटील, सुभाष कंग्राळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दुःखद निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट आणि पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते, सीमालढ्याचे भीष्माचार्य भाई प्रा. डॉ. एन. डी. पाटील, तसेच ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना मौन पाळून भावपुर्ण श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समाजकार्याचा जागर करण्यात आला. स्वागत कवी प्रा. निलेश शिंदे यांनी केले. प्रास्ताविक कवी प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले.

प्राचार्य डॉ. आनंद मेणसे पुढे म्हणाले, वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे. एक, त्यांच्या खास ‘अवचट शैली’तील ‘रिपोर्ताज’ या लेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे. अवचटांच्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लेखनानं समाजाला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्न /समस्या घ्यायची, त्याच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करून तीचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचट शैली’त त्याचं संगतवार विश्लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा हा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला, हे नि:संदिग्ध. तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले – फिरले आहेत. एवढेच नव्हे तर एस. एम. जोशी आणि जेपी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी बिहारमधल्या पुर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. तसेच पुर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. (‘पुर्णिया’ पुस्तकाला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे.) समाजातील विविध प्रश्नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन खऱ्या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो. त्यांचं संबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे. ज्या विषयाकडे एरव्ही कुणाचं सहज म्हणून लक्ष जात नाही, आणि समजा गेलंच तर, ते फार महत्त्वाचं वाटत नाही, अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या उपेक्षित विषयांचं अवचटांनी तळमळीनं नेतृत्व केलं आहे. ‘वेध’च्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर लिहितात, “किंबहुना त्याची भोवतालच्या घटनांकडे किंवा माणसांकडे बघण्याची नजर विलक्षण चौकस, शोधक आणि मुळात शंकेखोरच आहे.” त्यांच्या एकूण लेखनावर एक नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसते. उदा. ‘माणसं’, ‘वस्त्या माणसांच्या’, ‘अंधेर नगरी निपाणी’ (माणसं); ‘बावड्याचा बहिष्कार’, ‘पारधी मेळावा’, ‘मराठवाडा दंगल : दोन घटना’, ‘सत्याभामेची विटंबना’, ‘पोलीस कोठडीतील मृत्यू’ (कोंडमारा); ‘अंधश्रद्धांचे गुरू’, ‘अंधश्रद्धांची केंद्रे’, ‘अंधश्रद्धांचे बळी’ (संभ्रम); ‘वस्त्या वेश्यांच्या’ (धागे उभे आडवे); ‘बस्तरचं अरण्यरुदन’ (प्रश्न आणि प्रश्न) इत्यादी. या सर्वांमधून अवचट अन्यायग्रस्तांचे, पिचलेल्यांचे, नाडलेल्यांचे आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्यांचे अक्षरश: कितीतरी ‘प्रश्न आणि प्रश्न’ उपस्थित करतात.अमेरिका , अक्षरांशी गप्पा, आपले‘से’,आप्‍त, कार्यमग्न , कार्यरत, कुतूहलापोटी , कोंडमारा गर्द, छंदांविषयी , छेद, जगण्यातले काही , जिवाभावाचे , व्यक्तिचित्रे, दिसले ते धागे आडवे उभे, धार्मिक, People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर, पुण्याची अपूर्वाई ) प्रश्न आणि प्रश्न), बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर), मजेदार ओरिगामी, मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह), माझी चित्तरकथा, माणसं!, मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : वनात..जनात, वाघ्या मुरळी), वेध, शिकविले ज्यांनी, संभ्रम, सरल तरल, सुनंदाला आठवताना, स्वतःविषयी, सृष्टीत…गोष्टीत, सृष्टी-दृष्टी, वनात-जनात (बालवाङ्मय), हमीद, हवेसे हे विविधपूर्ण साहित्य समाजापुढे आदर्श म्हणून उभे आहे; ते वेळोवेळी समजून घेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न केले पाहिजेत.हे सगळं वास्तविक अभ्यास केल्यानंतर आपल्यासमोर नक्कीच एक प्रश्न उभा राहतो, की अवचट हे जे मांडतायत ते आपल्याच देशातील-समाजातील आहे काय? किंवा भारतातलं, नव्हे महाराष्ट्रातलंच आहे काय? याचं उत्तर ‘होय’. आपल्याच देशाच्या व समाजाच्या या दुसऱ्या चित्राशी आपण किती अनभिज्ञ असतो हे अवचटांचे लेखन वाचल्यावर जाणवते आणि असा प्रश्न आपल्यासारख्या ‘सुरक्षित’, ‘आपल्याच कोषात असणाऱ्या’, ‘आत्ममग्न जीवन शैली’त मश्गूल असणाऱ्यांच्या मनाला पडणंही साहजिक आहे. कारण आपल्या भोवती, आपल्याच समाजात जनावराचं जीवन जगणारे कुणीतरी आहेत, दोन घासांसाठी परिस्थितीशी नाना तऱ्हेनं संघर्ष करणारे कुणीतरी आहेत किंवा एकूण समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असणारं काहीतरी समाजात घडतंय, याची कानोकानी खबरही आपल्याला नसते. किंबहुना ‘जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?’, या खुशाल व बेफिकीर वृत्तीतून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अवचटांच्या दृष्टीनं ही स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असते आणि याच अस्वस्थतेतून ते सामाजिक बांधीलकीच्या नात्यानं तटस्थपणे या सर्व समस्यांची-प्रश्नांची उकल करू पाहतात. त्यांच्या मुळाशी जातात. प्रत्यक्ष भिडतात. ‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का? तर नाही, त्याला लालित्याची व बोलीभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्लेषण व मार्मिक निरीक्षण आहे. हे सर्व करताना अवचट त्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच गुंतलेले असतात – त्यात ते अडकून पडत नाहीत. त्यातूनच त्यांची म्हणून एक स्वत:ची लेखनशैली तयार झालेली आहे, जी वाचकांना तितकीच खिळवून ठेवते. अवचटांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका हाही एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. अर्थगर्भ व सूचक भाष्य करणाऱ्या अर्पणपत्रिकेच्या ओळी मनाला स्पर्शून व खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. उदा. ‘समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपऱ्यांना अपराधी भावनेनं अर्पण’ (माणसं); ‘नशिब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरुण) भाग्यविधात्यांना… काळजीपूर्वक’ (अमेरिका); ‘गावागावांतल्या दहशतीविरुद्ध एकाकी लढणाऱ्या अप्रसिद्ध कार्यकर्त्यांना – हा थोडा हातभार’ (कोंडमारा) इत्यादी.
‘तेच ते’ अशा प्रकारची टीका त्यांच्या लेखनावर झाली खरी, पण एक गोष्ट मोकळ्या मनानं मान्य करावी लागते. ती म्हणजे अवचटांचं लेखन हा मराठीतील एक महत्त्वाचा सामाजिक व वाङ्मयीन दस्तऐवज आहे. त्यांच्या ‘रिपोर्ताज’नं मराठी वाङ्मयात निश्चित अशी चांगली भर घातली हे निर्विवाद.अवचट भाषणं करतात, व्याख्यानं देतात, परंतु ती रूढार्थानं भाषणं नसतात : आपुलकीनं साधलेला ‘लोकसंवाद’ असतो. संत कबीर हा त्यांच्या मनस्वी चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे : कधी कधी ते जाहीरपणे कार्यक्रमांमधून कबीराची कवनंही गातात.
अवचट चित्रकारही आहेत : हातात कागद व पेन्सिल घेऊन पुणे विद्यापीठाच कॅम्पसमध्ये चित्रे रेखाटणत मग्न अवचटांना अनेक लोकांनी कैक वेळा पाहिलंय. अवचट उत्तम ओरिगामी करतात : अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा इतरांची भाषणं चालू असतात, तेव्हा अवचटांचे कान त्या भाषणांकडे व डोळे हातातल्या ओरिगामी-कागदावर. एक स्वच्छंदी, आनंदी आणि भरभरून आयुष्य जगणारा अवलिया व माणसांवर उत्कट प्रेम करणारा माणूस..!
समारोपाच्या अध्यक्षीय भाषणातून माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले, आजच्या काळात तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवा करण्यासाठी एकत्र येऊन चांगले राष्ट्र निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत. समाजात कार्य करण्याबरोबरच ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी अभ्यासाची साधना करायला हवी. त्यासाठी विविध भाषांचे आणि साहित्याचे आकलन करून घेणे खूप गरजेचे आहे.

स्वागत कवी प्रा. निलेश शिंदे यांनी केले. प्रास्ताविक कवी प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मयुर नागेनट्टी यांनी केले. कवी मधु पाटील यांनी आभार मानले. यावेळी अर्जुन सांगावकर, कवी चंद्रशेखर गायकवाड, संदिप मुतगेकर निलेश खराडे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कवी, कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————

पर्यावणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बेळगांव जिल्हा खानापूर तालुक्यातील जंगलामधील वैविध्यपूर्ण निसर्गरम्य परिसराचे संशोधन करण्याकरिता डॉ.अनिल अवचट आणि प्राचार्य आनंद मेणसे यांनी जंगल फिरून माहिती घेतली. अतिशय वास्तववादी चित्रण करून लेखन केले. खानापूर येथील जांबोटी, रामनगर, लोढा, नागरगाळी, दांदेली, मेंढील, आमगाव, भिमगड अरण्य येथील परिसर पाहून समजावून घेतला. येथील जमीन, जंगल, वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, फुले, डिंक, कंदमुळे झाडे वेलिंचा चिकिस्तक संशोधनात्मक अभ्यासकरून लेखन केले. जंगलतोडीमुळे झालेला परिणाम माणसांवर आणि प्राण्यांवर पाहिला. उपाय योजना आखून दीर्घ संशोधनात्मक लेख लिहिला; तो बेळगांव – कर्नाटक, महाराष्ट्रासह सर्वत्र लेख गाजला.

———————————————–

किर्लोस्कर रोड येथील वाड्यमय चर्चा मंडळ येथे सार्वजनिक वाचनालय बेळगांव यांच्यातर्फे डॉ.अनिल अवचट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यावेळी ते बेळगांव येथे आले होते. त्यांच्याशी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी, प्राचार्य आनंद मेणसे , प्रा. अशोक आलगोंडी , प्रा. निलेश शिंदे, निळूभाऊ नार्वेकर, विजया उरणकर, डॉ. सरीता मोटराचे, बेळगांव परिसरातील कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित असताना डॉ. अनिल अवचट यांच्या “मोर” या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. त्यांचे “मोर” हे ललित लेख संग्रह कर्नाटक विश्वविद्याल धारवाड आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ भुतरामट्टी- बेळगांव यांच्या अंतर्गत महाविद्यालयात हे पुस्तक अभ्यासक्रम म्हणून लावण्यात आले होते. त्यामुळे विशेष त्या पुस्तकावर लेखकाशी थेट संवाद साधण्यात आला. विनोद शैलीत दिलखुलापणे विविध विषयांची माहिती सांगितली.

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *