बेळगाव : शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडू हे प्रामाणिक व शिक्षणात सरासरीत सरस असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत मन लावून अभ्यास व खेळात रममान व्हा आणि मोठे व्हा. असा मौलिक सल्ला प्रा. अरुणा नाईक यांनी दिला. मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
येथील मळेकरणी सौहार्द सहकारी संघातर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळा, दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, खेळाडूंचा गुणगौरव तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अशा संयुक्त समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळेकरणी सौहार्द सहकारी संघाचे संस्थापक चेअरमन जवाहर देसाई होते.
मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. यावेळी सन २०२३-२४ या वर्षात मृत पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक, स्वागत बाळकृष्ण देसाई व मॅनेजर के. एन. कदम यांनी केले. अहवाल वाचन पूनम कंग्राळकर यांनी केले.
यावेळी साहित्यभूषण पुरस्कार प्राचार्या अरुणा जनार्दन नाईक, शिक्षक भूषण पुरस्कार प्राध्यापक महादेव खोत, सेवाभूषण पुरस्कार गुरुनाथ जनार्दन शिंदे, समाजभूषण पुरस्कार दत्तात्रय परशराम शिंदे, उचगाव भूषण पुरस्कार डॉ. प्रवीण भाऊराव देसाई यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार केला. यावेळी लेखक प्राचार्य भाऊराव कातकर यांच्या छ. शिवाजी महाराजांच्या संक्षिप्त पुस्तकाचे प्रकाशन केले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरेश लक्ष्मण देवरमणी, निवृत्त शिक्षक एन. एम. बोकडे, लक्ष्मण म्हेत्री, नामदेव पाटील, पुंडलिक बेळगावकर यांचाही यावेळी सत्कार केला. दहावीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या साहिबा खाजामिया सनदी, रोशनी राजू देवन, सायली ज्योतिबा डोनकरी यांचा रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरव केला. ब्रह्मलिंग कबड्डी संघ बसुर्ते, मळेकरणी हायस्कूल कबड्डी संघाचा सत्कार केला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना जवाहर देसाई म्हणाले, मळेकरणी सौहार्द संघातर्फे आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न ठेवता, कर्ज देणे, ठेवी ठेवून घेणे एवढ्या पुरताच व्यवहार मर्यादित नसून वर्षभर विविध उपक्रम सोसायटीच्या माध्यमातून राबविले जातात.
सभेला संस्थेचे संचालक सुरेश राजूकर, मारुती सावंत, रमेश घुमटे, लुम्माना पावशे, चंद्रकांत देसाई, किशोर पावशे, नीळकंठ कुरबुर, कविता जाधव व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीणा पवन देसाई यांनी आभार मानले.