बेळगाव : शनिवार दिनांक 21/9/2024 रोजी मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली येथे कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर, ॲड अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत बेळगावकर, शितल यळ्ळूरकर, प्रवीण जाधव, चारुदत्त केरकर, अमृत जाधव, श्रीकांत कडोलकर, रवी नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. दीपक किल्लेकर अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना यांनी भूषविले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर मंथन स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थी संघांचे श्रीकांत कडोलकर यांनी या मुलांच्या तयारीसाठी विशेष असे परिश्रम घेऊन मुलांना यशस्वी केले त्याबद्दल त्यांचा देखील उपस्थित मान्यवरांकडून विशेष असा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुख्याध्यापक मुचंडीकर सर यांनी शाळेत चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन मुलांची प्रगती आणि शैक्षणिक कार्यासाठी आपण व आपला सर्व स्टाफ सतत काम करू आणि शाळेचा नावलौकीक व पटसंख्या येणाऱ्या काळात नक्कीच उंचावू हा भरवसा दिला.
याप्रसंगी बोलताना श्री. अमर यळ्ळूरकर यांनी मुलांना प्रोत्साहनाची गरज असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साह वाढतो असे सांगितले. तसेच आपण या शाळेच्या साठी कायम पुढाकार घेऊन कार्य करू आणि आपल्या वडिलांचे जे स्वप्न होते की गरजू विदयार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन व शैक्षणिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनीही कै. किसनराव यळ्ळूरकरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, त्यांच्या मातोश्री या शाळेच्या माजी विद्यार्थी त्यामुळे या शाळेसोबत त्यांची नाळ पूर्वीपासूनचं अगदी घट्ट आहे यापुढे देखील शाळेच्या विकासासाठी नेहमीच लागेल ती मदत करू असे अष्टेकर साहेबांनी यावेळी आपली मनीषा व्यक्त केली. रवी नाईक यांनी किसनराव यळ्ळूरकरांच्या कार्याच्या स्मृती जागवल्या आणि माजी विद्यार्थी संघांचे शाळेसाठी असलेले सहकार्य आणि जिव्हाळा नेहमी असाच राहील. विद्यार्थी घडविण्यासाठी आपण सतत सर्व शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे आहोत असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कार्यक्रमातील आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. दीपक किल्लेकर यांनी विद्यार्थ्याने जिद्दीने व कष्ट घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे आणि आपल्या शाळेचे नाव उंचवावे असे मत मांडले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुचंडीकर सर सर्व शाळेचा स्टाफ यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मुचंडीकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माळी सर यांनी केले.