बेळगाव : गोकाक महालक्ष्मी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 14 आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष जितेंद्र यांनी तक्रार केली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांसह 14 आरोपींनी कर्ज घेऊन पैसे परत न करून फसवणूक केली आहे. कर्जाची परतफेड न करून सत्तेचा गैरवापर केल्याची माहिती असून एप्रिलमध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी सागर नामक व्यक्तीने अधिक फसवणूक केली आहे. 6 कोटी 97 लाखांची मुदत ठेव ठेवून दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेऊन ते कर्ज परतफेड न केल्याचा पुरावा सापडला असून बँकेच्या व्यवहारांचे चार वेळा ऑडिट झाले आहे. मात्र एकदाही या फसवणुकीचा मुद्दा सापडला नाही. या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांसह 112 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याची सरकारी किंमत 13.17 कोटी आहे. तर बाजारमूल्य 50 कोटी रुपये आहे, अशी माहितीही डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.