बेळगाव : आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलीस यंत्रणेला चुकीचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी बिम्स हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची तक्रार बेळगुंदी येथील समिती कार्यकर्ते शटूप्पा चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले आहे. तसेच सदर निवेदन प्रांताधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दि. 6 फेब्रुवारी रोजी आपल्यावर हल्ला करून काहीजणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी आपण बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तसेच एक्स-रे काढण्यात आला. त्यावेळी आपल्याला दुखापत झाली असून हाड मोडल्याचे देखील एक्स-रे मधून स्पष्ट झाले होते तसा अहवाल देण्यात आला होता. मात्र पोलिसांना देण्यात आलेल्या एक्स-रे रिपोर्टच्या मध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत पोलिसांची दिशाभूल झाल्याचे दिसून येत आहे. असे कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शट्टूप्पा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.