बेळगाव : बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांना दिला.
दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पावसाळ्यात पूर येतो व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत तर नाहीच समस्यांवर कायमस्वरूपी तोडगाही काढता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी बळ्ळारी नाल्याला भेट देऊन शेतकरी व स्थानिकांना समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बळ्ळारी नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिकांशी बैठक घेतली जाईल, सविस्तर चर्चा करून अहवाल तयार केला जाईल. बळ्ळारी नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची गरज आहे. याबाबत लवकरच कार्यवाही करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, आमदार राजू सेठ, अधिकारी, स्थानिक शेतकरी उपस्थित होते.