मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक नुकतीच साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रारंभी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे, ज्ञानेश्वर मुळे, श्रीपाद जोशी, नागनाथ कोत्तापल्ले, हरी नरके या सर्वांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. त्याला संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी अनुमोदन दिले.
संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यावेळी बोलताना म्हणाले, मराठी भाषा सुमारे २२०० वर्षांपूर्वीची जुनी भाषा असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही साहित्य संमेलनामध्ये ठराव करीत होतो. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच मराठी भाषेच्या अभिजाततेचे पुरावे गोळा करणाऱ्या समितीचे त्यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आगामी २० वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, रविवार ता. ५ जानेवारी २०२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी संमेलन नीटनेटके व चार सत्रात घेण्याचे ठरविण्यात आले. संमेलनाला दिग्गज साहित्यिक व अभिनेता किंवा अभिनेत्रीला बोलाविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले, सदस्य रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर , सुभाष मजुकर, बळीराम देसुरकर आदी उपस्थित होते. डॉ. तानाजी पावले यांनी शेवटी आभार मानले.