Monday , September 21 2026
Breaking News

मृगाच्या उंबरठ्यावर वरुणराजाची कृपा; खरीप हंगामासाठी शेतकरी पल्लवीत

Spread the love

 

बेळगाव : अनेक दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाचे हास्य फुलले आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीने शेतशिवार नवचैतन्याने बहरून गेले असून खरीप हंगामाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामांना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण झाली असली, तरी शेतकऱ्यांची नजर आकाशाकडेच लागून होती. शनिवारी व रविवारी तालुक्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळाला असून शेतशिवारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. यामुळे पेरणीच्या तयारीला नवसंजीवनी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र शनिवारपासून ढगाळ वातावरणासह सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी परिसरात आल्हाददायक गारवा निर्माण केला आहे. त्यामुळे हा पाऊस केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही आनंददायी ठरला आहे.

मृगाचे पाणी म्हणजे ‘सोन्याचे पाणी’

ग्रामीण भागात “मृगाचे पाणी म्हणजे सोन्याचे पाणी” अशी म्हण आजही प्रचलित आहे. मृग नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. सोमवार, ८ जूनपासून सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत असून ८ ते २१ जून हा कालावधी मृग नक्षत्राचा राहणार आहे. पारंपरिक मान्यतेनुसार यंदा मृग नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे मृगाच्या प्रारंभाने शेतकरी वर्गात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेरणीसाठी अद्याप थोडी प्रतीक्षा

पावसाने हजेरी लावली असली तरी मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय होणे आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता हवामानाचा अंदाज, जमिनीचा पोत आणि ओलाव्याची स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

सध्या ढगाळ वातावरण कायम असून अधूनमधून पावसाच्या सरी आणि उन्हाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असून मान्सूनच्या दमदार आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *