Monday , September 21 2026
Breaking News

बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील लढा तीव्र करा; २२ जूनच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ देसाई

Spread the love

 

खानापूर : बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांत जनजागृती वाढवून २२ जून रोजी बेळगाव येथे आयोजित भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. तर सीमाभागातील प्रश्नांवर युवा समिती करीत असलेले कार्य योग्य दिशेने असून त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला आपला पूर्ण पाठिंबा राहील, असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.

खानापूर येथे सोमवारी आयोजित खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अध्यक्षीय भाषणात गोपाळ देसाई यांनी सांगितले की, मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने २२ जून रोजी बेकायदा कन्नड सक्तीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन पत्रकांचे वितरण करावे. दुकाने, दूध डेअरी, विविध संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करून नागरिकांना आंदोलनाची माहिती द्यावी. तसेच २९ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासाठीही पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार दिगंबर पाटील यांनी खानापूर युवा समितीच्या कार्याचे कौतुक करताना सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि शैक्षणिक प्रश्नांसाठी युवा कार्यकर्ते सातत्याने संघर्ष करीत असल्याचे नमूद केले. बेळगाव येथील मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गर्लगुंजी येथील केपीएस शाळेच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत एक लाख सह्यांच्या मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. तालुक्यात ३० सह्या पुस्तिकांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित २० पुस्तिका तातडीने जमा करून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.

यावेळी धनंजय पाटील, बाळासाहेब शेलार, विलास बेळगावकर, राजाराम देसाई, रमेश धबाले, शंकर गावडा आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.

बैठकीस चव्हाण, रुक्मण्णा झुंजवाडकर, पुंडलिक नाकाडी, कृष्णा मनोळकर, डी. बी. पाटील, डी. एम. भोसले, अजित पाटील, संजीव पाटील, एन. एन. पावले, संदेश कोडचवाडकर, परशुराम पाटील, म्हात्रू धबाले, शिवाजी पाटील, राजेंद्र कोलम, सुनील पाटील, लक्ष्मण पाटील, प्रमोद पाटील, आप्पासाहेब मुतगेकर, पुंडलिक पाटील, कृष्णा कुंभार, पुंडलिक चव्हाण यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *