

बेळगाव : मराठी शाळांमध्ये सुरू असलेल्या कन्नडसक्तीविरोधात तसेच मराठी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
युवा समितीने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव आणि खानापूर येथील प्रत्येकी एका मराठी शाळेला कर्नाटक पब्लिक स्कूल (केपीएस)चा दर्जा देण्यात आला आहे. या शाळांमध्ये द्विभाषिक अभ्यासक्रम राबविण्याची तरतूद असली तरी मराठी-इंग्रजी माध्यमाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्याऐवजी कन्नड-इंग्रजी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरण्याचा दबाव शिक्षकांवर आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित शाळांना तातडीने मराठी-इंग्रजी पुस्तके उपलब्ध करून देण्याची तसेच अभ्यासक्रमाबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये द्विभाषिक शिक्षणपद्धती लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे. पहिली ते पाचवीपर्यंत मातृभाषा व इंग्रजी आणि त्यानंतर पूर्णपणे इंग्रजी माध्यम अशी रचना असलेल्या या पद्धतीमुळे मराठी भाषा, विद्यार्थी आणि मराठी भाषिक शिक्षकांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मराठी शाळांचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यांच्यावर इतर भाषांचे अतिक्रमण होऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने यावर्षीपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ‘मूल्य शिक्षण’ हा नवीन विषय सुरू केला आहे. मात्र, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी या विषयाची पुस्तके मराठीत उपलब्ध न करून देता कन्नड व इंग्रजी भाषेतच उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचे सांगत, मराठी भाषेतील पुस्तके उपलब्ध होईपर्यंत हा विषय मराठी शाळांमध्ये शिकवू नये आणि लवकरात लवकर मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
या मागण्यांसह विविध विषयांवरील निवेदन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta